Sunday 29 July 2012

अलविदा!

प्रिय भावांनो आणि बहिणींनो,

गेले 10 महिने मी हा ब्लॉग चालवित आहे. आज निरोप घेण्याची वेळ आली आहे. 15 ऑगस्ट साजरा करून 16 ऑगस्ट रोजी मी अमेरिकेला जात आहे. पुढील 15 दिवस तयारीसाठी लागतील. ऑक्टोबर 2013 पर्यंत मी अमेरिकेत आहे. अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील डलास येथे माझे वास्तव्य राहणार आहे. टेक्सास हे अमेरिकेचे दुस-या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. तसेच डलास हे टेक्सासमधील तिस-या क्रमांकाचे तर संपूर्ण अमेरिकेतील नवव्या क्रमांकाचे शहर आहे. डलासमध्ये मी एका अमेरिकी कंपनीसाठी काम करणार आहे. आमचा 14 महिन्यांचा करार आहे. डलासला माझी मावशीही राहते. अमेरिकेतील वास्तव्याच्या काळात ब्लॉग लिहून होईल, असे वाटत नाही. याचाच अर्थ पुढील 14 महिन्यांच्या काळात मी नवा लेख ब्लॉगवर टाकू शकणार नाही. 

आज घडीला ब्लॉगवर 150  लेख आहेत. मी एवढे लिखाण करू शकेल, असे मलाही वाटले नव्हते. वाचकांच्या प्रेमामुळे हे शक्य झाले. ब्लॉगची वाचकसंख्या सव्वा लाखाला स्पर्श करीत आहे. वाचक संख्येचा लाखाचा आकडा पार करणारे फारच थोडे ब्लॉग मराठीत आहेत. विशेष म्हणजे अवघ्या नऊ-दहा महिन्यांत सव्वा लाख हिट मिळविणारा एकही वैचारिक ब्लॉग मराठीत नाही. आज ब्लॉगच्या पाठिराख्यांची संख्या 300 ला स्पर्श करीत आहे. एवढी सदस्यसंख्या असलेला ब्लॉगही मराठीत नाही. या ब्लॉगला एवढी लोकप्रियता मिळेल, असे मला अजिबात वाटले नव्हते. ब्लॉगबद्दल आपण जो जिव्हाळा दाखविला, त्याबद्दल मी खरोखरच भारावून गेले आहे. निरोप घेताना उर भरून आला आहे. 

या ब्लॉगची दखल विकिपीडियानेसुद्धा घेतली. देवनागरीत अनिता पाटील असा सर्च दिल्यास विकीपीडियावरचे माझे पान दिसायला लागते. मी विकीपीडियाची आभारी आहे. 

नजीकच्या भविष्यात ब्लॉगवर नवीन लेख पडणार नसला तरी १50 लेख आपल्या सोबत आहेतच. त्यांना वाचकांचा प्रतिसाद मिळतच राहील, अशी अपेक्षा व्यक्त करून आपणा सर्वांचा निरोप घेते. 14 महिन्यांनी काय होईल, हे आताच सांगणे कठीण आहे. मात्र, परत आल्यानंतर पुन्हा एकदा ब्लॉग लेखन करायला मला नक्कीच आवडेल. 

जय जिजाऊ, जय शिवराय.

आपली लाडकी बहीण
अनिता पाटील.

No comments:

Post a Comment