Monday 9 July 2012

वैदिक धर्म बडविण्यात बौद्ध-जैनांचे योगदान



उपनिषदे : अवैदिक परंपरेचा परिणाम 
 आज भारतात वैदिक धर्म पूर्णत: बुडाला असून, अहिंसाधिष्ठित मूलनिवासी दयाधर्म विविध रूपांत दिसून येतो. महाराष्ट्रातील भक्तिपंथ हे या अहिंसाधिष्ठित मूलनिवासी परंपरेचे एक रूप होय. ब्राह्मणी परंपरेतील उपनिषदे ही वैदिक धर्मापेक्षा मूलनिवासी दयाधर्माला जवळची आहेत. उपनिषदांना वेदान्त म्हणतात. वेदान्त म्हणजेच वेदांचा अंत. उपषिदांत हिंसा  वर्ज्य  केली आहे. वैदिक धर्माचा मुख्य आधारच हिंसा होता. 
उपनिषदांनी वेदांचा मुख्य आधार तोडून वैदिक परंपरा संपविली, म्हणून त्यांना वेदांत म्हणतात. बौद्ध आणि जैन धर्माचा भारतासह संपूर्ण आशिया खंडात प्रसार झाल्यानंतर ब्राह्मणांनी स्वत:च्या परंपरांचा त्याग करून दयाधर्मीय परंपरेचा स्वीकार केला. त्यातून उपनिषदांची निर्मिती झाली. अशा प्रकारे उपनिषदांचे कर्ते ब्राह्मण ऋषि असले तरी त्यातील विचार बिगरब्राह्मणी परंपरेतून घेण्यात आले असल्यामुळे उपनिषदांना अवैदिक दयाधर्म परंपरेत समाविष्ट करणेच अधिक श्रेयस्कर ठरेल. 

बौद्ध आणि जैन धर्माची धास्ती 
बौद्ध आणि जैन धर्मामुळे भारतातील वैदिक परंपरेचा उच्छेद झाला. पुढे कुमारिल भट्ट व आद्य शंकराचार्यांनी वैदिक परंपरा स्थापित केली, तरी तिचा ‘यज्ञसंस्कृती' हा  मूळ आत्मा हरवला होता. शंकराचार्यांनी एकप्रकारे बौद्धमताचा स्वीकार करून वैदिक धर्मात बदल केले. बौद्ध-जैन परंपरांचा हा आघात वैदिकांच्या प्रचंड जिव्हारी लागला. या परंपरांविषयी असंख्य कठोर वचने वैदिकांनी लिहून ठेवली आहेत. बौद्ध-जैन मंदिरांत वैदिकाने प्रवेश करू नये असे कडक निर्बंध घालणारे संस्कृत वचन असे :
हस्तिना ताड्यमानोऽपि न गच्छेज्जैनमंदिरम् !२
हे वाचन पाहता वैदिक आर्य ब्राह्मणांनी बौद्ध आणि जैन धर्माची धास्ती घेतली होती असे दिसून येते.

पशु हिंसेला प्रतिबंध 
वैदिक परंपरेत कर्म हे प्रधान असून त्या काळीही जाती होत्या. वैदिक हे वेदच प्रमाण मानीत. बौद्ध परंपरेत वेद, कर्म व जाती या तिन्ही गोष्टी दयाधर्माच्या विरुद्ध जाऊ लागल्या. त्यामुळे बौद्धांनी त्यांचा नि:पात केला. या संदर्भात मोठ मोठे वादविवाद झाले. (उत्तर काळात कुमारिल भट्टाने बौद्ध पंडितांसोबत घातलेले वादविवाद प्रसिद्धच आहेत.) ‘शेवटी दयाधर्माचा जय होऊन वैदिकांस नमावे लागले. प्रमाणं परमं श्रुति: (अर्थ : श्रुती म्हणजेच वेदवचन हेच प्रमाण) इत्यादि मताभिमानाची सूत्रे जाऊन त्या जागी अस्वग्र्यं लोकविद्धिष्टं (लोकांत जे रूढ आहे ते प्रमाण मानावे.) इत्यादि वचने लोकांमध्ये चालू झाली. यज्ञात पशु मारू नये याविषयी उत्तरकालीन वेदवाङ्मयात अनेक वचने सापडतात. ती सर्व बौद्ध धर्माच्या रेट्यामुळे आलेली दिसतात. ऐतरेय आरण्यकातील हे एक वचन पाहा :
पुरूषं वै देवा: पशुमालभन्त 
अमेध्या: पशवस्तस्मादेतेषां नाश्नीयात
(द्वितीय पंचिका. आठवा खंड)
अर्थ : पशुंतून मेध्य निघून तांदुळांत आले आहे. म्हणून पशूंनी यज्ञ न करता तांदुळांनी करावे. 
तैत्तिरीय आरण्यकाच्या १२ व्या अनुवाकात असाच उपदेश आढळून येतो. 
माता रुद्राणां० मा गामनागामदितिं वधिष्ट ।।ऋग्वेद ६-७-८
या मंत्रात याज्ञिकांस असा उल्लेख उपदेश आहे की, तुम्ही गरीब गायीचा जीव घेऊ नका. गायीला माता म्हटल्याचा हा वेदवाङ्मयातील पहिला उल्लेख होय. कालांतराने गाय ही नुसतीच गोमाता न राहता तिच्यात ३३ कोटी देव घुसडविण्यात आले.  बौद्धांच्या अहिंसा तत्त्वावर कडी करण्याच्या प्रयत्नात वैदिकांनी हे उपद्व्याप केले. त्यात वैदिक धर्माचा मूळ आत्मा मात्र हरवला. एकप्रकारे वैदिक धर्मच पराभूत झाला.
देवा-धर्माच्या नावर हिंसा करणे हे माणूसपणाचे  लक्षण नव्हे. अमानवी वैदिक ब्राह्मण आर्यांना भगवान गौतम बुद्ध व भगवान महावीर यांनी माणूस बनविले.  

अनिता पाटील

No comments:

Post a Comment