Friday 16 September 2011

परशुरामाची भाकडकथा भाग - 6

परशुरामाला पित्यानेच म्हटले महापापी


परशुरामाचा पिता जमदग्नीसुद्धा परम संतापी होता. अतिशय रागीट माणसाला जमदग्नीचा अवतार म्हणण्याची पद्धत मराठीत आजही रुढ आहे. जमदग्नीकडे कामधेनू गाय होती. त्याकाळातील भारतातला सर्वश्रेष्ठ क्षत्रिय राजा सहस्त्रार्जुन याने ही गाय जमदग्नीच्या आश्रमातून बळाचा वापर करून नेली. ही गोष्ट परशुरामाला समजताच तो संतापला. त्याने सहस्त्रार्जुनाचा खून केला. गायीच्या हरणासाठी थेट मृत्युदंडाची शिक्षा हे अतीच झाले. परशुरामाचे हे घोर कृत्य जेव्हा त्याचा बाप जमदग्नीला कळाले, तेव्हा तो दु:खी झाला. संतप्तही झाला. त्याने परशुरामाची चांगलीच खरडपट्टी काढली. तसेच शास्त्राचे बोधामृतही त्याला पाजले. जमदग्नीच्या मुखातून बाहेर पडलेले परमहंस संहितेतेतील हे पाहा काही श्लोक :
राम राम महाबाहो भवान पापमकारषीत ।
अवधीन्नरदेवं यत सर्वदेवमयं वृथा ।।३८।।
अर्थ : हाय हाय परशुरामा, तू महाभयंकर पाप केले आहेस. राम! राम!! तू मोठा वीर असलास तरी नरदेवाच्या म्हणजेच राजाच्या शरीरात सर्व देव असतात. तू अशा सर्वदेवमय नरदेवाचा अकारण वध केला आहेस.
वयं हि ब्राह्मणास्तान क्षमयार्हणतां गता ।
यया लोकगुरुर्देव: पारमेष्ठ्यमंगात् पदम् ।।३९।।
अर्थ : आपण लोक ब्राह्मण आहोत. आपण क्षमाशील असले पाहिजे. क्षमेमुळेच आपण पुजनीय ठरतो. सर्वांचे पितामह ब्रह्मदेवही केवळ क्षमेमुळेच ब्रह्मपदावर पोहोचले आहेत.
जमदग्नीचा या पुढचा श्लोक सर्वाधिक महत्त्वाचा आहे. ब्रह्महत्या हे सर्वांत मोठे पाप आहे, असे उत्तरकालीन ब्राह्मण ग्रंथांत म्हटले आहे, ते कसे खोटे आहे, हे या श्लोकातून स्पष्ट होते. हा श्लोक असा : 
राजो मूर्धाभिषिक्तस्य वधो ब्रह्मवधाद् गुरू: ।।
तीर्थसंसेवया चांहो जह्यङ्गच्युतचेतन: ।।४१।।
अर्थ : सार्वभौम राजाचा वध करणे हे ब्राह्मणाचा वध करण्यापेक्षाही मोठे पाप आहे. (या श्लोकातील पहिल्या ओळीच्या शेवटी आलेल्या गुरू या शब्दाचा अर्थ मोठा, अधिक जास्त असा आहे.) हे महापाप धुवून काढण्यासाठी आता भगवंताचे स्मरण करीत तीर्थयात्रा कर. 
राजाचा अकारण वध करून परशुरामाने ब्रह्महत्येपेक्षाही महाभयंकर पाप केले होते, हे खुद्द त्याचा पिता जमदग्नीनेच म्हटले होते. त्यासाठी त्याला नामस्मरण करीत तीर्थयात्रा करण्याचे प्रायश्चित्तही सांगितले होते. हे आजच्या सनातनी ब्राह्मणांना मान्य नाही असे दिसते. त्यांच्याच पूर्वजांनी लिहिलेल्या पोथ्या गुंडाळून ठेवून ब्राह्मण घोर पापी परशुरामाला आपला पूर्वज ठरवू पाहत आहेत. 

(या लेखात वापरलेले सर्व संस्कृत श्लोक श्रीमद्भागवतातील ९ व्या स्कंधातील तसेच १५ व्या अध्यायातील आहेत.)


      - अनिता पाटील, औरंगाबाद.

1 comment: