Saturday 5 November 2011

वैदिक लोक : अग्नीचा शोध लागलेले आदिमानव !


प्रकरण १.

भारतातील प्राचीन वैदिक संस्कृती यज्ञ आणि पशुपालन या दोन पायांवर उभी होती. वैदिक स्वत:ला आर्य म्हणवून घेत. अग्नी हा मानवी सभ्यतेतील पहिला वैज्ञानिक शोध समजला जातो. अग्नीच्या शोधामुळे माणूस कच्चे मांस खाण्याऐवजी भाजून, शिजवून खाऊ लागला. मानवाच्या प्रगतीतील ही दुसरी अवस्था आहे. वैदिक संस्कृती याच टप्प्यात विकसित झाली. वैदिक आर्य अग्नीशिवाय जगूच शकत नव्हते. वैदिकांची संस्कृती अंत्यंत प्रगत आणि उन्नत होती, असे मानण्याची अंधश्रद्धा भारतात कित्येक शतकांपासून जोपासली हेतूत: गेली आहे. वेद म्हणजे ज्ञानाचे महाभांडार आहे, असा अपसमज शतकानुशतके प्रसृत केला गेला. काही हितसंबंधी पोटपूजक पुरोहित आणि इतिहासकारांनी हे पाप केले. वैदिक आर्य प्रगत नव्हे, तर मानवी प्रगतीच्या दुसरया टप्प्यावर जगत होते. ते भटके आणि पशुपालक होते. त्यांना शेतीचे ज्ञान नव्हते. त्यामुळे मांस हेच त्यांचे मुख्य अन्न होते. मांस खाण्यायोग्य करण्यासाठी वैदिक आर्यांना अग्नीची गरज होती. सासरी जाणारया मुलीसोबत अग्नीही दिला जात असे. वैदिक संस्कृतीने अग्नी सतत प्रज्वलित ठेवणे हे एक आद्य कर्तव्य ठरविले, त्यामागील कारण असे व्यवहारिक आहे. या व्यवहारिकतेतून अग्निहोत्राचा म्हणजेच यज्ञाचा जन्म झाला. यज्ञ संस्कृतीचा जन्म अशा प्रकारे वैदिकांच्या दैनंदिन गरजेतून झाला आहे. घरातील अग्नी विझला तर वैदिकशास्त्रात विविध प्रायश्चित्ते सांगितली आहेत. 
अग्नीसंबंधीचे काही शास्त्रादेश पुढील प्रमाणे:
विवाहाग्निमग्रतोऽजस्त्रं नयन्ति ।।
अर्थ : वधुवरांचे पुढे विवाहकाली सिद्ध झालेला अग्नी अजस्त्र न्यावा१. (अजस्त्र म्हणजे मोठ्या भांड्यातून. मोठ्या भांड्यातून यासाठी की मुलीला सासरी आणेपर्यंत तो विझता कामा नये.)
पाणिग्रहणादि गृह्यं परिचरत्स्वयं 
पल्यपि वा पुत्र: कुमार्यन्तेसी वा ।।
अर्थ : लग्न झाल्यापासून घरात अग्नीची सेवा स्वत: करावी. स्वत:ला शक्य नसल्यास पत्नीकडून, पुत्राकडून qकवा अविवाहित कन्येकडून करावी२.
यदि तूपशाम्येत्पत्न्यूपवसेदित्येके ।।
अर्थ : घरातील अग्नी जर विझला तर पत्नीने उपोषण करावे, असे ऋषींचे सांगणे आहे३.
वरील शास्त्रादेश पाहिले असता वैदिक लोक पूर्णत: अग्नीवरच कसे अवलंबून होते, हे लक्षात येते. वैदिकांच्या हातातील अग्नी काढून घेतल्यास ते कच्चे मांस दातांनी तोडून खाणारया आदिमानवाच्या अवस्थेत जाऊन पडतील. ही वस्तुस्थिती एकदा समजून घेतली की, आर्यांच्या अफाट प्रगतीचा तसेच महान संस्कृतीचा भोपळा आपोआप फुटतो. अग्निशिवाय दुसरे कोणतेच वैज्ञानिक रहस्य वेदांना माहीत नाही. या पाश्र्वभूमीवर +वेदांकडे चला+  ही दयानंद सरस्वतींसारख्या वेदाभिमान्यांची हाक प्रगतीकडे नेण्याऐवजी उलट्या दिशेने मानवाच्या आदिम अवस्थेकडे नेणारी ठरते. 


या लेखमालेतील इतर लेख पुढील लिंकवर वाचा 

  



अनिता  पाटील, औरंगाबाद. 

...................................................................



संदर्भ :
१. आश्वलायन सूत्र. भाग-गृह्य. अध्याय : १. खंड : ८. सूत्र : ५
२. आश्वलायन सूत्र. भाग-गृह्य. अध्याय : १. खंड : ९. सूत्र : १
१. आश्वलायन सूत्र. भाग-गृह्य. अध्याय : १. खंड : ९. सूत्र : ३
...................................................................

No comments:

Post a Comment