Thursday 31 May 2012

जैन, बौद्ध आणि त्यांची अहिंसा


गेस्ट रायटर : महावीर सांगलीकर


जैन आणि बौद्ध धर्मात अहिंसेला फार महत्व आहे. पण त्यांच्या अहिंसेबद्दल समाजात गैरसमजच फार आहेत. हे गैरसमज हिंसेकडे टोकाचा ओढा असणा-या कांही हितसंबंधी लोकांनी या दोन्ही धर्मांना बदनाम करण्यासाठी पद्धतशीरपणे पसरवले आहेत.

मुळात जैन आणि बौद्ध हे दोन्ही धर्म लढाऊ लोकांशी संबंधीत आहेत. अहिंसेचे तत्वज्ञान भारतात शूरांनी आणि वीरांनी मांडले, ही बाब ध्यानात घ्यायला पाहिजे. अहिंसेचे तत्वज्ञान हे भेकडांचे तत्वज्ञान नाही. एवढेच नव्हे तर जे निर्भय असतात तेच अहिंसेचे पालन चांगल्या रीतीने करू शकतात असा जैन व बौद्ध धर्माचा विश्वास आहे.

या दोन्ही धर्मात साधुंसाठी असणारे नियम आणि अनुयायांसाठी असणारे नियम वेगवेगळे आहेत. येथे साधूंना कसल्याही प्रकारची हिंसा करण्यास मनाई आहे, पण अनुयायांना वेळप्रसंगी, स्वसंरक्षणासाठी; परिवार, गाव, देश, धर्म यांच्या रक्षणासाठी हिंसा करण्यास परवानगी आहे. प्राचीन भारतातील अनेक राजघराणी जैन किंवा बौद्ध धर्माचे अनुयायी होती. त्यांच्याकडे बलाढ्य सैन्ये होती. त्यांनी परकीयांशी आणि अन्यायी स्वकीयांशीही युद्धे केली.

जोवर भारतावर जैन व बौद्ध राजघराणी राज्य करत होती, तोवर परकीय आक्रमक भारतात घुसू शकले नाहीत. अगदी जगजेता अलेक्झांडर आणि त्याचा सेनापती सेल्युकस निकेटरला पराभूत व्हावे लागले. पण पुढे अनेक इतर कारणांनी जैन व बौद्ध हे दोन्ही धर्म कमकुवत झाले. बौद्ध धर्माला तर भारतातून परागंदा व्हावे लागले. भारतात वैदिकांच्या ओंजळीने पाणी पिणा-या तथाकथित क्षत्रियांचे राज्य आले. त्यानंतरच भारतात तुर्क, मोगल, इंग्रज आदी परकीयांचा शिरकाव झाला. त्यांच्यापुढे भारतीय राजे टिकू शकले नाहीत. याचा अर्थ ते राजे पराक्रमी नव्हते असा नाही, तर वैदिक धर्मातील वर्णव्यवस्थेचे ते पालन करत असल्यानेच त्यांचा पराभव झाला. लढण्याचे काम फक्त क्षत्रियांनीच करायचे या नियमामुळे त्यांच्या सैन्यात इतरांना प्रवेश नव्हता, आणि क्षत्रियांनी फक्त लढायाचेच असते या नियमामुळे ते विनाकारण आणि एकमेकांशीच लढत बसले.

तरीही ज्यांना वाटते की बौद्ध धर्माच्या अहिंसेमुळे भारतावर परकीयांचे राज्य आले, त्यांनी याचा विचार करावा की चीन, जपान, थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम, कोरिया यासारख्या बौद्ध देशांवर परक्यांचे राज्य का आले नाही? अगदी आपला शेजारी देश असणा-या नेपाळचे उदाहरण घ्या. नेपाळला कोणी कितीही हिंदू राष्ट्र म्हणत असले तरी त्या देशावर बौद्ध धर्म आणि बौद्ध संस्कृती यांचाच प्रभाव आहे. संपूर्ण भारतावर राज्य करणारे इंग्रज नेपाळवर मात्र राज्य करू शकले नाहीत. तो देश शेवट पर्यंत स्वतंत्रच राहिला. याच नेपाळमधील गुरखा तरुण भारतीय व ब्रिटीश सैन्यात मोठ्या संख्येने भरती होत असतात. अतिशय शूर म्हणून प्रसिद्ध असणारे हे गुरखा बौद्ध धर्मीय असतात.

वर मी जैन व बौद्ध साधूंना कसल्याही प्रकारची हिंसा करण्यास मनाई असते असे म्हंटले आहे. पण प्रत्यक्षात प्राचीन काळी या दोन्ही धर्मातील साधू स्वसंरक्षणात तरबेज असत. किंबहुना आजच्या मार्शल आर्ट्सचे मूळ उद्गाते बौद्ध साधू आहेत. राज्यावर आलेल्या संकटकाळी जैन साधूंनी साधुवेशाचा त्याग करून हाती तलवार घेतली अशी अनेक उदाहरणे मिळतात.

ज्यांना अहिंसा या शब्दाचा तिटकारा आहे, त्यांच्यावर सावरकरांच्या सहा सोनेरी पाने या पुस्तकाचा पगडा आहे. या पुस्तकात सावरकरांनी पुष्यमित्र शुंग याचे कौतुक केले आहे. हा पुष्यमित्र शुंग मौर्य सम्राट बृहद्रथ याचा सेनापती होता. त्याने बृहद्रथाला सैन्याची परेड चालू असताना कपटाने मारले. असे मारण्याचे कारण सत्ता बळकावणे हेच असू शकते, पण सावरकरांनी बृहद्रथ हा बौद्ध असल्याने त्याने अहिंसेचे स्तोम माजवले होते म्हणून त्याला मारले असे म्हंटले आहे. असो. पुष्यमित्र शुंग सत्तेवर आल्यावर त्याने त्याच्या राज्यातील बौद्ध आणि जैन साधुंची कत्तल करायला सुरवात केली. त्यावेळी कलिंग येथे खारवेल हा जैन सम्राट राज्य करत होता. त्याने पुष्यामित्राला धडा शिकवण्यासाठी आपल्या बलाढ्य सैन्यासह मगधेकडे कूच केले. पुष्यमित्र घाबरला, पण त्याचवेळी त्याला कळले की दमित्रीस हा ग्रीक राजा भारताच्या पश्चिम सीमेवर आक्रमण करण्यासाठी येत आहे. तेंव्हा खारवेलने आपला मोर्चा पश्चिमेच्या दिशेने वळवला. खारवेल आपला प्रतिकार करणार आहे हे कळताच दमित्रीस माघारी फिरला. मग खारवेलने परत मगधेच्या दिशेने कूच केले. पुष्यमित्र इतका घाबरला होता की तो खारवेलला चक्क शरण आला. सावरकर पुष्यमित्राच्या या शरणागतीची बाब आपल्या पुस्तकात उघड करत नाहीत.

शेवटी एवढेच सांगावेसे वाटते की जैन-बौद्धांची अहिंसा ही प्रॅक्टिकल अहिंसा आहे. तेथे भेकडपणाला जागा नाही. क्वचित कांही लोक अहिंसेचा अतिरेक करत असतील, पण अशा लोकांकडे या दोन्ही धर्मात दुर्लक्ष केले जाते.

No comments:

Post a Comment