Friday 16 May 2014

मराठा आरक्षण दिले असते, तर हे हाल झाले नसते

काँग्रेस-राष्ट्रवादीने आता तरी धडा घ्यावा

-राजा मइंद, कार्यकारी संपाद, अपाविमं


देशभरात भाजपाला दणदणीत विजय मिळाला. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांचा दणकून पराभव झाला. महाराष्ट्रात तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या अंगावर मतदारांनी कपडेही ठेवले नाहीत. भाजपाला गुजरात नंतर महाराष्ट्रातच एवढा मोठा विजय मिळाला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने मराठा आरक्षणाचा जो खेळ केला त्याचा हा परिणाम आहे. मराठा समाजाला २५ टक्के आरक्षण देण्याची मागणी केली १० वर्षे राज्यात होत आहे. या मागणीला आघाडीने हवा देण्याचे काम केले. पण अंतिम टप्प्यात आरक्षण देण्याऐवजी ते घोळात कसे पडेल, यासाठी कटकारस्थाने केली. मराठा आरक्षणासाठी महसूलमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमण्याचे नाटकही आघाडी सरकारने केले. पण, तो फक्त एक खेळ होता. 
मराठा समाजास आरक्षण मिळू नये, असेच दोन्ही काँग्रेसचे धोरण आहे, असा संशय या काळात येत राहिला. लोकसभा निवडणुकीच्या मराठा आरक्षणाच्या मागणीने जोर धरला तेव्हा ब्राह्मणांनाही आर्थिक दुर्बलतेच्या निकषावर आरक्षण मिळायला हवे, असे पिल्लू राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोडले. म्हणजे लढायला मराठे आणि आरक्षण लाटायला ब्राह्मण! यावरून बराच गोंधळ उडाला. 'अपाविमं'ने या खेळीचा तीव्र निषेध केला होता. "रक्त सांडले मराठ्यांनी, आरक्षण मिळणार ब्राह्मणांना" हा लेख आम्ही ४ फेब्रुवारी २०१४ रोजी अपाविमंवर प्रसिद्ध केला होता. अपाविमंच्या या भूमिकेला मराठा समाजातून मोठा पाठिंबा मिळाला होता. 

सगळीकडून आरडाओरड झाल्यानंतर राष्ट्रवादीने ब्राह्मण आरक्षणाचे पिल्लू हळूच बाहेर काढून घेतले. मात्र, राष्ट्रवादीच्या निवडणूक जाहीरनाम्यात मराठ्यांसोबतच मुसलमानांनाही आरक्षण देणार अशी नवी घोषणा करण्यात आली. मुसलमानांनी आरक्षण मागितले नाही, तरी राष्ट्रवादी त्यांना आरक्षण देण्याच्या बाता करीत होती. त्यांना कोणालाच आरक्षण द्यायचे नाही, केवळ मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, यासाठी मधून मधून अशी पिलं सोडून द्यायची, असा संदेश यातून गेला. त्यामुळे संपूर्ण मराठा समाज बिथरला होता. 'अपाविमं'ने यावर लिहावे, अशी विनंती आम्हाला अनेक पातळ्यांवरून झाली. तथापि, आम्ही गप्प राहणे पसंत केले. मराठ्यांना आरक्षण हवे असेल, तर लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धडा शिकवतील, असे आम्हाला वाटत होते. अखरे मराठा समाजाने आपला रोष दाखवून दिला आहे. 

आता विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षणाची घोषणा सरकारने करावी. अन्यथा जे हाल लोकसभा निवडणुकीत झाले, तेच हाल विधानसभा निवडणुकीतही होतील, हे लक्षात ठेवावे. मराठा समाजाला आरक्षण देताना उगाच इतर समाजाच्या आरक्षणाचा विषय मध्ये आणून गोंधळ माजविण्याचा प्रयत्न सरकारने करू नये. कोणाला आरक्षण द्यायचेच असेल, तर द्या; पण त्याची सांगड मराठा आरक्षणाशी घालू नका. मराठा समाजाला निर्विवाद आरक्षण द्या, अशी आमची स्पष्ट मागणी आहे.  "… मराठा समाजाला देताना तुमचे हात थरथरत असतील, तर तुम्हाला मतदान करताना समाजाचेही हात उद्या थरथरतील", असा इशारा आम्ही "रक्त सांडले मराठ्यांनी, आरक्षण मिळणार ब्राह्मणांना" या लेखाच्या शेवटी दिला होता. तोच पुन्हा एकदा देऊन ठेवतो. 

आणखी वाचा
रक्त सांडले मराठ्यांनी, आरक्षण मिळणार ब्राह्मणांना

No comments:

Post a Comment