Wednesday 17 April 2013

पांडुरंग आठवले यांनी चोर-लुटारू कोणाला म्हटले?

म्हणे, एकादशीच्या दिवशी सर्वांनी एकत्र जमून आक्रोश केला तरी प्रभू तो ऐकत नाही!

-राजा मइंद, (संपादक मंडळ सदस्य, अपाविमं)

समताधिष्ठित वारकरी सांप्रदायाला संपवून ब्राह्मण वर्चस्ववादी धर्माची स्थापना करण्यासाठी स्वाध्याय परिवाराचा जन्म झाला आहे, याचे सुतोवाच आम्ही मागच्या लेखात केले होते. त्याबाबत आज जरा विस्ताराने पाहू या.  पांडुरंग बुवा आठवले यांच्या प्रवचनांतील उतारेच्या उतारे वैष्णवधर्मीय वारक-यांच्या श्रद्धांची टिंगल-टवाळी करतात. वारक-यांवर थेट हल्ला करण्याचे मात्र आठवले टाळतात. थेट हल्ला केल्याने वारक-यांकडून आक्रमक प्रतिहल्ला होईल, हे न ओळखण्याएवढे आठवले अडाणी नव्हते. त्यामुळे वारक-यांविरुद्ध छुपी विष पेरणी करण्याचे तंत्र आठवल्यांनी वापरले. वारक-यांचा उल्लेख टाळून त्यांच्या श्रद्धांना ते टार्गेट करतात. 

१५ दिवसांनी येणा-या एकादशीला दिवसभर उपवास करणे आणि रात्री संतांच्या भजनाचा जागर करणे, हा वारकरी धर्म आणि अन्य वैष्णव पंथीयांच्या धर्मश्रद्धेचा पाया आहे. पायावर घाव घातला की इमारत आपोआप कोसळेल, असा अंदाज बांधून पांडुरंग बुवा आठवले यांनी एकादशीच्या उपवासाला आणि संतांच्या भजनाला थोतांड ठरविण्याचा प्रयत्न केला आहे. ‘एकादशीच्या दिवशी सर्वांनी मिळून आक्रोश केला तरी प्रभू तो ऐकत नाही' असे आठवले म्हणतात. येथे वारकरी हा शब्द वापरण्याचे आठवले टाळतात. हे कपटनाट्य आहे. याला नथीतून तीर मारणे म्हणतात. पण आठवले यांच्या विवेचनात एकादशी आणि भजनाचा (ज्याला आठवले आक्रोश म्हणतात) उल्लेख असल्यामुळे हा हल्ला वैष्णव आणि वारक-यांवरच आहे, हे स्पष्टच आहे. या पुढे जाऊन आठवलेबुवा एकादशीला संतांची भजने म्हणणा-यांना (म्हणजेच वारक-यांना) आळशी, निष्क्रिय अशी विशेषणे लावतात. इतकेच नव्हे तर या भोळ्या भक्तांची चोर-लुटारू अशी संभावना करण्याचा नतद्रष्टपणाही करतात. वारक-यांची अशी  अवहेलना आठवले अनेक ठिकाणी करतात. 

'दशावतार' या पुस्तकातील पान क्र. ११ वरील हा उतारा पाहा : 

‘...दर एकादशीच्या दिवशी आळशी आणि निष्क्रिय लोक एकत्र होतात व ओरडून सांगतात : ‘प्रभो! ह्या जगात फार घाण साचली आहे. तू ये आणि ती सगळी काढून टाक.' पण अशा ओरडण्याने भगवंत येणार नाही, हा शास्त्रीय सिद्धांत आहे.... गीतेच्या भाषेत सांगायचे झाले तर परित्राणाय साधूनाम' असेल, सज्जन ईश्वरकार्य करीत असतील तर त्यांच्या संरक्षणासाठी भगवान येतो. चोरांनी लुटलेल्या मालाची वाटणी करीत असताना होणारी भांडणे मिटविण्यासाठी तो येत नाही...'१

वारक-यांची अशी मानहाणी करण्यासाठी पांडुरंगबुवा आठवले वेदांची साक्ष काढतात. ‘दशावतार' या पुस्तकात पान क्र. १४ वर आठवले काय म्हणतात ते पाहा : 

‘...कारणाशिवाय अवतार होत नाही. ‘न ऋतश श्रांतस्य सख्याय देवा:' हा वैदिक सिद्धांत आहे. एकादशीच्या दिवशी सर्वांनी एकत्र जमून आक्रोश केला तरी प्रभू तो ऐकत नाही. ‘हा दगडाचा देव आहे', अशा आक्रोशाने तो पाझरणार नाही...'२

एकादशीचा नेम करणा-या वैष्णवांचे संतभजन पांडुरंगबुवांच्या दृष्टीने आक्रोश असून वैष्णवांचा देव दगड आहे. या बडबडीला आठवले वैदिक सिद्धांत म्हणतात. बहुजन समाजाची थट्टा करणारे हे विवेचन वैदिक सिद्धांत असूच शकत नाही. हा असुरी सिद्धांत आहे. मानवतेची हेटाळणी करणा-या पांडुरंगबुवांच्या या सिद्धांताला ‘दादासुराचा सिद्धांत' म्हणणेच अधिक योग्य ठरेल.

संदर्भ 
१. दशावतार, दुसरी आवृत्ती, ऑगस्ट १९८९, पान क्र. ११ 
प्रकाशक : सद्विचार दर्शन ट्रस्ट, मुंबई.

२. दशावतार, दुसरी आवृत्ती, ऑगस्ट १९८९, पान क्र. १४ 
प्रकाशक : सद्विचार दर्शन ट्रस्ट, मुंबई.


या विषयावरील इतर लेख

1 comment: